Sunday, September 27, 2026
Homeजळगावडीजे, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना उत्स्फूर्त प्रतिसाद; भुसावळात ४६ तर वरणगावात २५...

डीजे, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना उत्स्फूर्त प्रतिसाद; भुसावळात ४६ तर वरणगावात २५ मंडळांचा सहभाग, जामा मशीद चौकात अध्यक्षांचा सत्कार

भुसावळ-वरणगावात गणरायाला भावपूर्ण निरोप !

डीजे, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना उत्स्फूर्त प्रतिसाद; भुसावळात ४६ तर वरणगावात २५ मंडळांचा सहभाग, जामा मशीद चौकात अध्यक्षांचा सत्कार

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दहा दिवसांच्या भक्तिमय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी भुसावळ आणि वरणगाव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट, लेझीम पथके आणि आकर्षक सजावटीसह निघालेल्या विसर्जन मिरवणुकांनी शहर दुमदुमून गेले.

भुसावळ शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू होती. सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकांना वेग आला. महिला, युवक, बालकांसह हजारो नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा पथके, लेझीम आणि विविध आकर्षक देखाव्यांमुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.

जामा मशीद चौकात मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार – –
भुसावळ शहरातील तब्बल ४६ गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. जामा मशीद चौकातून प्रत्येक मंडळाची मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पुढे रवाना करण्यात आली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मंडळांना पुढील मार्गावर मार्गस्थ करण्यात आले.यावेळी प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वयाचे वातावरण राहावे, तसेच उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे निगराणी – –
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्याचबरोबर ड्रोनद्वारे मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात आले. रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी प्रमुख मार्गांवर पुरेशी प्रकाशव्यवस्थाही करण्यात आली होती.
वाहतूक सुरळीत ठेवणे, मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क होती. आरसीसी प्लाटूनचे जवान, पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यासह प्रशासन व पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक व नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनीही जामा मशीद चौकात उपस्थित राहून विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनात सहभाग घेतला.

वरणगावातही उत्साहाला उधाण – –
वरणगाव शहरातही गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डिजे ‘ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिस व होमगार्डचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वरणगाव येथे डीवायएसपी राजनंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्यासह पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.दरम्यान, अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देत निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. भक्तिभाव, उत्साह आणि शांततेच्या वातावरणात गणरायाला निरोप देत यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या