साकेगाव बसस्थानक चौकात दोन तरुणांवर चाकू हल्ला !
बाचाबाचीनंतर मानेवर वार; हल्लेखोर पसार, तीन दिवसांत चाकू हल्ल्याची दुसरी घटना

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील साकेगाव येथील गजबजलेल्या बसस्थानक चौकात मंगळवारी सायंकाळी दोन तरुणांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. राहुल सपकाळे (वय २५) आणि कुणाल बाळू वाघ (वय २३) अशी हल्ल्यातील तरुणांची नावे आहेत.
बाचाबाचीनंतर झालेल्या हल्ल्यात राहुलच्या मानेवर चाकूने वार झाल्याचे सांगण्यात येत असून, त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सपकाळे हा मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून साकेगाव बसस्थानक चौकात आला होता. त्यावेळी भुसावळकडून आलेल्या काही व्यक्तींशी त्याची बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर त्यातील एका व्यक्तीने राहुलच्या मानेवर चाकूने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत कुणाल वाघ याच्यावरही हल्ला झाल्याची माहिती आहे.अचानक झालेल्या चाकू हल्ल्यामुळे बसस्थानक चौकात काही काळ खळबळ उडाली. राहुल जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्लेखोरांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
घटनेनंतर संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांसमोर त्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय, हल्ल्यात किती जण सहभागी होते, तसेच या घटनेमागे पूर्ववैमनस्य होते का, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तीन दिवसांत चाकू हल्ल्याची दुसरी घटना
साकेगाव परिसरात अवघ्या तीन दिवसांत चाकू हल्ल्याची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भुसावळ-साकेगाव एमआयडीसी मार्गावर एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता साकेगावच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात हल्ला झाल्याने परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, तसेच मंगळवारी झालेल्या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

