Wednesday, October 7, 2026
Homeगुन्हामानवतेला काळीमा ! यावल तालुक्यात ५० वर्षीय दिव्यांगाला विहिरीत १५ मिनिटे उलटे...

मानवतेला काळीमा ! यावल तालुक्यात ५० वर्षीय दिव्यांगाला विहिरीत १५ मिनिटे उलटे लटकवले ;

मानवतेला काळीमा ! यावल तालुक्यात ५० वर्षीय दिव्यांगाला विहिरीत १५ मिनिटे उलटे लटकवले ;

व्हिडिओ व्हायरल करणार्‍या २ नराधमांना अटक, १ फरार.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारा अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार समोर आला आहे.केवळ मजाक बाजी, मस्करी, टिंगल-टवाळी आणि भीती दाखवण्याच्या उद्देशाने दहिगाव येथील एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीला विहिरीत तब्बल १५ मिनिटे उलटे लटकवून नग्न करत मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता या भीषण कृत्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ३ संशयितांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्परता दाखवत २ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत,तर एका फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

नेमकी काय आहे घटना.?
दहिगाव येथील पाटील गल्लीत राहणारे नामदेव रामदास पाटील (वय ५०) हे अपंगत्व (दिव्यांग) असलेले व्यक्ती आहेत. त्यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आणि आपबिती मांडताना दिलेल्या माहितीनुसार:
घरून फसवून नेले दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी नामदेव पाटील यांना घरून फिरवण्याच्या आणि प्रेमाने फुस लावून सोबत नेले.
विहिरीत उलटे लटकवले: दहिगावपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या नावरा रस्त्यावरील वेडू शंकर पाटील यांच्या विहिरीवर आरोपींनी त्यांना नेले.तेथे संशयित आरोपी नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (२३) व पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (२२) या दोघांनी नामदेव पाटील यांचे दोन्ही पाय धरून त्यांना विहिरीच्या खोल पाण्यात १५ मिनिटे उलटे लटकवून ठेवले.
अमानुष मारहाण व विवस्त्र केले: विहिरीत उलटे लटकवलेले असतानाच आरोपींनी कपडे काढून त्यांना नग्न केले आणि चापटांनी मारहाण केली.

विहिरीत पडून जीव जाण्याची शक्यता असतानाही अमानुष कृत्य : पीडित व्यक्तीचा पाय निसटला असता तर त्यांचा विहिरीत पडून जागीच मृत्यू झाला असता, याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपींनी हे प्राणघातक आणि अमानुष कृत्य केले.
व्हिडिओ व्हायरल करून बदनामी – या संपूर्ण घटनेदरम्यान आरोपींचा तिसरा अनोळखी साथीदार विहिरीजवळ उभा राहून मोबाईलवर व्हिडिओ बनवत होता.हा व्हिडिओ नंतर व्हॉट्सॲपवर व्हायरल करून पीडित दिव्यांगाची समाजात घोर बदनामी करण्यात आली.
दोन आरोपी जेरबंद पोलिसांची कडक कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तक्रारदार नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी तातडीने कारवाई करत नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील वय २३, रा. दहिगाव पंकज उर्फ झग्या संतोष पाटील वय २२, रा. दहिगाव
या दोन मुख्य संशयितांना तात्काळ अटक केली आहे. व्हिडिओ बनवणारा तिसरा पसार साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
सदर प्रकरणाचा पुढील सविस्तर आणि कडक तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करत आहेत.अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या