७/१२ उताऱ्यावर बोअरवेलची नोंद करण्यासाठी लाच; आमोद्याचा तलाठी रंगेहाथ जाळ्यात !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शेतातील बोअरवेलची ७/१२ उताऱ्यावर नोंद करून उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून लाचेची मागणी करणाऱ्या आमोदा (ता. यावल) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शैलेश अंकुश झोटे (वय ३८, रा. रावेर, जि. जळगाव; मूळ रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

बोअरवेलच्या नोंदीसाठी मागितली लाच
आमोदा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात सिंचनासाठी बोअरवेल केली होती. शासनाच्या योजनेतून सोलर सिस्टीम बसविण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर बोअरवेलची नोंद आवश्यक असल्याने त्यांनी तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे नोंद करण्यासाठी अर्ज केला.ही नोंद करून उतारा देण्यासाठी तलाठ्याने ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी ३ हजार ५०० रुपये शेतकऱ्याने यापूर्वी दिले होते. त्यानंतर उर्वरित ५०० रुपये आणि उतारा देण्यासाठी आणखी ५०० रुपये, अशी एकूण १ हजार रुपयांची मागणी तलाठ्याने केली.
ACBकडे तक्रार; सापळा रचून कारवाई
लाचेच्या मागणीला वैतागलेल्या शेतकऱ्याने ६ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी तलाठी झोटे याने पूर्वी ३ हजार ५०० रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे तसेच उर्वरित १ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे ACBकडून सांगण्यात आले.त्यानंतर आमोदा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी शैलेश झोटे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ACBच्या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोहवा सुनील वानखेडे, पोकॉ प्रणेश ठाकूर आणि पोकॉ मनोज पाटील यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे तसेच कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाच मागितल्यास ACBशी संपर्काचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव ACB कार्यालयाचा दूरध्वनी ०२५७-२२३५४७७, व्हॉट्सॲप ७५८८६६१०६४ तसेच टोल-फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार करता येते.

