अवैध शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण व वणव्यामुळे होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाबाबत वनविभागाचे मार्गदर्शन.
यावल, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. ८
वन्यजीवांचे संरक्षण,वनसंपदेचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वन्यजीव सप्ताहानिमित्त यावल पश्चिम वनक्षेत्रातील वाघझिरा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव आणि वनपरिसंस्थेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत वनसंवर्धनाच्या कार्यात समाजाचा सहभाग किती आवश्यक आहे,याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

सौरिष सहाय उप वनसंरक्षक, यावल वन विभाग,जळगाव तसेच एस.ए.पाटील,सहाय्यक वनसंरक्षक, यावल प्रादेशिक वनक्षेत्र व कॅम्पा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
वन्यजीव म्हणजे पर्यावरणीय समतोलाचा महत्त्वाचा घटक
यावेळी पी.डी.जोशी वनपरिक्षेत्र अधिकारी,यावल पश्चिम आणि टी.वाय.देवरे,वनपाल,वाघझिरा यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगितले.वन्यजीव हे केवळ जंगलाची शोभा नसून संपूर्ण वनपरिसंस्थेच्या साखळीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे जंगलातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल टिकून राहण्यास मदत होते असे मार्गदर्शन करण्यात आले.
अवैध शिकार व वृक्षतोडीचे गंभीर परिणाम –
वन्यजीवांच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेपाचा परिणाम होत असून अवैध शिकार,अवैध वृक्षतोड,वनक्षेत्रातील अतिक्रमण आणि जंगलातील वणवे यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर मोठा परिणाम होऊ शकतो,याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
वनक्षेत्राचे संरक्षण केवळ वनविभागाची जबाबदारी नसून स्थानिक नागरिक,विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण संवर्धनात सहभागी होणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
वणव्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वनक्षेत्रात लागणाऱ्या वणव्यामुळे वनसंपत्तीचे नुकसान होण्याबरोबरच वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होतो.अधिवासात बदल झाल्याने वन्यजीव मानवी वस्त्यांच्या जवळ येण्याची शक्यता वाढू शकते.परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरणदूताची भूमिका बजावावी
वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणाविषयी प्रेम व जबाबदारीची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थी आपल्या कुटुंबात तसेच परिसरात वनसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचवू शकतात असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वनकर्मचाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी यावल पश्चिम वनक्षेत्रातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वन्यजीव व वनसंवर्धनासंदर्भातील माहिती जाणून घेतली.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून ‘वन वाचवा,वन्यजीव वाचवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

