Friday, October 9, 2026
Homeजळगावप्लास्टिक पिशव्यांविरोधात नगर परिषदेची धडक कारवाई; ५०

प्लास्टिक पिशव्यांविरोधात नगर परिषदेची धडक कारवाई; ५०

वरणगावात प्लास्टिक पिशव्यांविरोधात नगर परिषदेची धडक कारवाई; ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग जप्त

​वरणगाव,  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          ता. ८ : पर्यावरण संवर्धन आणि शहराची स्वच्छता कायम राखण्याच्या दृष्टीने वरणगाव नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक विरोधी मोहिमेचा बडगा उगारण्यात आला आहे. गुरुवारी ( ता. ८) शहरात धडक मोहीम राबवत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या बंदीत प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्याची दणकेबाज कारवाई करण्यात आली. नगर परिषदेच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांचे आणि दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

​शासनाच्या नियमांनुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही शहरात अनेक ठिकाणी या बंदीत प्लास्टिकचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी ( ता. ८ ) सकाळी शहराच्या स्टेशन रोड या मुख्य मार्गावरील दुकानांसह बाजारपेठेत प्लॅस्टीक बॅग शोध मोहीम उघडली. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांत सुमारे ८ ते १० ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कॅरीबॅगचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
​कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या हस्तगत करून त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे इतर व्यापाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकमुळे शहरातील गटारी तुंबणे, कचऱ्याची समस्या निर्माण होणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणे असे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्लास्टिकमुक्त वरणगाव करण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
​ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून, आगामी काळातही नियमितपणे आणि अधिक तीव्रतेने सुरूच राहणार आहे. त्यामुळे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर पूर्णपणे थांबवावा, अन्यथा कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा नगर परिषद अधिकाऱ्यांनी दिला आहे.
​सदर धडक कारवाई नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रशिद नौरंगाबादी, लेखापाल संतोष गुजरे, लेखापाल राहुल जाधव, सीटी कोऑर्डिनेटर दीपक काळे, रवी नारखेडे, संजय माळी, रवींद्र गायकवाड व प्रशांत माळी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. नगर परिषदेच्या या धडक मोहिमेचे शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या