बाल संस्कार विद्यालयाच्या २६ व्या शारदोत्सवाला उत्साहात प्रारंभ; भव्य मिरवणुकीने यावलकरांचे लक्ष वेधले!
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी,
संचलित बाल संस्कार बालवाडी, बाल संस्कार विद्या मंदिर व बाल संस्कार माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या शारदोत्सवाला रविवार दि.११ ऑक्टोबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
सकाळी ८ वाजता श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले यांच्या घरापासून श्री शारदा मातेची भव्य काढण्यात आली.

ढोल-ताशांचा गजर आणि विविध पथकांच्या सहभागामुळे मिरवणुकीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरण निर्माण झाले.यात झांज लेझीम,कळशी व दांडिया पथकांचा समावेश होता.शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणुक बघण्यासाठी व बालकांचे कौतुक करण्यासाठी शहरातील स्त्री पुरुष नागरिकांनी मोठी गर्दी केली.संपूर्ण मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी व ज्योती वाणी यांच्या हस्ते सपत्नीक शारदा मातेची स्थापना केली गेली .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालवाडी मुख्याध्यापिका . अंजली कवडीवाले,प्राथमिक मुख्याध्यापक सुनिल माळी, माध्यमिक मुख्याध्यापक अतुल गर्गे तसेच उत्सव प्रमुख सविता कमलाकर बारी व राजेंद्र गोपाळ फालक यांनी नियोजन केले.

मिरवणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी किंजल दीपक बडगुजर, गिरीश सुधाकर सोनार ( बालवाडी ) , प्रतीक किशोर पाटील (४थी) व चंचल राजेश भोईटे (४थी) यांच्यासह इतर सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.संस्थेचे सर्व संचालक मंडळ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने उत्सवाचा प्रारंभ उत्साहात झाला.तीन दिवस विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

