वरणगाव परिसर भक्तीमयः जाडगावच्या वाकडी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

वरणगाव परिसराचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जाडगाव निवासिनी श्री वाकडी माता मंदिरात शारदीय
नवरात्रोत्सवाला अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात विधिवत घटस्थापना व महाआरती करण्यात आली.
भाविकांची दर्शनासाठी गर्दी
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी परिसरातील हजारो भाविकांनी वाकडी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. संपूर्ण मंदिर परिसर ‘प्रसन्न वाकडी माता की जय’ अशा जयघोषाने आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. नवस फेडणारे आणि पायी चालत येणारे शेकडो भाविक भल्या पहाटेपासूनच मातेच्या चरणी लीन होताना दिसत आहेत.
९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांमध्ये मंदिरात दररोज सकाळी महाअभिषेक, महापूजा, दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी सामूहिक आरती व भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अष्टमीच्या दिवशी होणारा होम हवन आणि नवमीला होणारी महाआरती यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

