Thursday, October 15, 2026
Homeगुन्हाभुसावळच्या सराफ बाजारातील तीन लाखांचे दागिने चोरीप्रकरणी महिला अकोल्यातून जेरबंद!

भुसावळच्या सराफ बाजारातील तीन लाखांचे दागिने चोरीप्रकरणी महिला अकोल्यातून जेरबंद!

भुसावळच्या सराफ बाजारातील तीन लाखांचे दागिने चोरीप्रकरणी महिला अकोल्यातून जेरबंद!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मंगळसूत्र व पेंडलसह तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील सराफ बाजारात ग्राहक बनून दुकानात आलेल्या महिलेने हातचलाखीने तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल लंपास केल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोला येथून महिला संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, तिच्याकडून चोरीचा संपूर्ण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानात चोरीची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे पेंडल चोरून नेले होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून १४ ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
अकोट फाईल परिसरातून महिलेला ताब्यात
तपासादरम्यान पोलिसांचे पथक अकोला जिल्ह्यातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुमताज परविन अब्दुल (रा. नेहरू नगर, सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला) हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत १४.५८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत २ लाख ४० हजार रुपये, तसेच ३.३१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक पेंडल, किंमत ६० हजार रुपये, असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, संदीप चव्हाण, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी सावकारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रिझवान शेख यांचा समावेश होता.
सराफ बाजारातील चोरीचा अल्पावधीत छडा लावून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या