Friday, October 16, 2026
Homeगुन्हारावेर पोलिसांची कारवाई; शेतातील विजतारा चोरताना दोघे जेरबंद

रावेर पोलिसांची कारवाई; शेतातील विजतारा चोरताना दोघे जेरबंद

रावेर पोलिसांची कारवाई; शेतातील विजतारा चोरताना दोघे जेरबंद!
भोर-अजंदा रस्त्यावरील चोरीचा उलगडा; २६ किलो विजतारा जप्त, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
रावेर     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   शेतशिवारातील विजतारा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रावेर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, भोर-अजंदा रस्त्यावरील विजतारा चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे, ता. रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या विजतारांचे २६ किलो तुकडे जप्त करण्यात आले असून, आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रावेर पोलिस ठाण्यात याप्रकरणी ६ मे २०२६ रोजी गुन्हा क्रमांक २२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ मधून भोर ते अजंदा रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या विजतारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी अग्रवाल पॉवर प्रा. लि.चे साइट सुपरवायझर राजेंद्र रामदास ठाकूर यांनी फिर्याद दिली होती.


गस्तीतील गुप्त माहितीने लागला सुगावा
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र शेतशिवारात कॅमेऱ्यांची उपलब्धता नसल्याने ठोस माहिती मिळत नव्हती. दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार शेतातील मोटारपंप आणि विजतारा चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेत रावेर शहरातील भंगार दुकाने, सराईत चोरटे आणि हिस्ट्रीशीटर यांची तपासणी करण्यात आली.
१४ ऑक्टोबरच्या रात्री पोलिस निरीक्षक संदीप पाटील गस्तीवर असताना रावेर-अजंदा रस्त्यावर काही संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तातडीने तपासणी केली असता जुबेर तडवी आणि शरीफ तडवी हे दोघे आढळून आले. त्यांची झडती घेतली असता विजतारा कापण्यासाठी वापरले जाणारे कटर आणि पक्कड मिळून आली.
भंगार दुकानातून चोरीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, विजतारा चोरी करण्याच्या उद्देशाने ते परिसरात आल्याचे समोर आले. तसेच दोन ते तीन महिन्यांपूर्वी भोर-अजंदा रस्त्यावरील विजतारा चोरी केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जुबेर तडवी याचे विवरे गावात भंगाराचे दुकान असून, त्याने या गुन्ह्यातील चोरीच्या विजतारांपैकी २६ किलो तुकडे काढून दिले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याच्या दृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन आमोदकर, विजय चौधरी, समाधान ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील आणि रुबाब तडवी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या