भुसावळमध्ये दुर्गा विसर्जन शांततेत . गुलाल उधळण्यात शहर नंबर वन
२०४ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन; मुख्य मिरवणुकीत ५६ मंडळे सहभागी, संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट पहारा
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरात २०४ मंडळाचे विसर्जन शांततेत पार पडले आहे .दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात पोलीस प्रशासनाने सुरक्षेचा कडक पहारा ठेवला होता , संपूर्ण शहरावर सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील २०४ सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होत असताना,मुख्य विसर्जन मिरवणुकीत ५६ मंडळे सहभागी झाले होते .

मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे व्यापक नियोजन केले होते.
सराफ बाजार, मरीमाता मंदिर परिसर, लक्ष्मी चौक, बाजारपेठ पोलीस ठाणे परिसर, गांधी पुतळा, शहर पोलीस ठाणे परिसर, यावल नाका, राहुलनगर आणि तापी नदीकाठ या संवेदनशील भागांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते .
ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा आणि ड्रोनच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले गेले असून, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क होती. उत्सवाच्या वातावरणात शांततेला गालबोट लागू नये, यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
नृसिंह मंदिरापासून मुख्य दुर्गा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून अनुक्रमांक देण्यात आले आहेत. मुख्य मिरवणुकीतील ५६ मंडळांसह अन्य सार्वजनिक मंडळांकडूनही स्वतंत्रपणे विसर्जन केले .

मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. यंदा विसर्जनाचा दिवस बुधवार असल्याने स्थानिक परंपरेचा विचार करून अनेक मंडळांनी दिवसा मिरवणूक काढून रात्री १२ वाजल्यानंतर, म्हणजेच गुरुवारी पहाटे मूर्ती विसर्जित करण्याचे नियोजन केले होते . त्यामुळे मिरवणुकांचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन आणि विसर्जनस्थळावरील सुरक्षा यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

