-बनावट ओळखपत्राद्वारे थार गाडी खरेदी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
१५ लाख ८५ हजारांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप चाळीसगावातील प्रकार
-चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी कमी शिकलेपणाचा गैरफायदा घेत विश्वास संपादन करून बनावट ओळखपत्र तयार केले आणि एका व्यक्तीच्या नावावर १५ लाख ८५ हजार रुपये किमतीची थार गाडी खरेदी केल्याचा प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिकन देवराम पाटील राहणार वाघडू, तालुका चाळीसगाव यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, विशाल चौधरी टाकळी प्र.चा, भूषण चौधरी (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) आणि विशालचे अन्य दोन मित्र यांनी संगनमत करून त्यांच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे थार गाडी खरेदीसाठी १५ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, फिर्यादी भिकन पाटील यांना कोणत्याही शोरूममध्ये न नेता त्यांच्या नावावर परस्पर गाडीची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर एमएच ५२ बी ७३७७ क्रमांकाची थार गाडी कुठेतरी लपवून ठेवून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.हा प्रकार डिसेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादीचे घर तसेच नाशिक येथील अशोक स्तंभाजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेशी संबंधित असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३३५, ३३६(३), ३३७, ३३८, ३१६(२), ३४०(२) आणि ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस करीत आहेत.

