भुसावळ नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख वैभव पवार यांचा भीषण अपघातात मृत्यू!
शिवपूर-कन्हाळे रोडवर कार झाडावर आदळली; बहीण गंभीर जखमी, दोन दिवसांपूर्वीच चिमुकल्या मुलीचा साजरा केला होता वाढदिवस
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ शहरातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भुसावळ नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख तथा संकीर्ण विभागप्रमुख वैभव सुरेश पवार (वय ३२) यांचे शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची लहान बहीण गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भुसावळ शहरासह नगरपरिषद प्रशासनात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैभव पवार हे शनिवारी मध्यरात्री आपल्या बहिणीसोबत कारने (क्रमांक एमएच १९ ईपी ३२२२) प्रवास करीत होते. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास शिवपूर-कन्हाळे रोडवरील कुकरेजा सुपरमार्टजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. यावेळी कार झाडावर आदळल्याने वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत वैभव पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर त्यांच्या बहिणीला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी बहिणीला तातडीने गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या वेळी समोरून डीजेची गाडी आल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे
या अपघातप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात असून, घटनास्थळावरील परिस्थिती आणि संबंधित बाबींची तपासणी केली जात आहे. डीजे वाहनाशी संबंधित माहिती तसेच कारवरील नियंत्रण सुटण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच चिमुकल्या मुलीचा वाढदिवस
वैभव पवार यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वाधिक हळहळ व्यक्त होत आहे ती त्यांच्या कुटुंबीयांच्या परिस्थितीबाबत. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या चार वर्षीय आरु या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला होता. घरात आनंदाचे वातावरण असतानाच काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि आप्तस्वकीय असा परिवार आहे.
हसतमुख स्वभावामुळे सर्वांमध्ये लोकप्रिय
वैभव पवार हे भुसावळ नगरपरिषदेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. आस्थापना प्रमुख तथा संकीर्ण विभागप्रमुख म्हणून काम करताना त्यांचा अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांशी नेहमीच सलोख्याचा संबंध होता. हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा स्वभाव ही त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागातील सहकारी आणि शहरातील नागरिकांमधून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

