जळगाव जि.प. बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी व कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२
रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि सही करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. २ नोव्हेंबर २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार हे सब काँट्रॅक्टर असून त्यांनी पिंपरी खुर्द (ता. एरंडोल) येथे सन २०२५-२६ मधील गाव अंतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरणाचे १,९०,७६३ रुपयांचे काम पूर्ण केले होते. या पूर्ण केलेल्या कामाची मोजणी पुस्तिका (एमबी) व बिले तयार करण्यासाठी स्थापत्य अभियंता तथा कनिष्ठ अभियंता श्री. भागवत चवरे यांनी यापूर्वीच तρχारदाराकडून २०,०००/- रुपये स्वीकारले होते.
मात्र, त्यानंतरही बिले मंजूर करण्यासाठी गेले असता, आरोपी क्र. २ भगवंत चवरे यांनी बिलावर सही करून पुढे पाठवण्यासाठी आणि आरोपी क्र. १ श्री. सतीश मनसुलाल सिसोदिया (उपविभागीय अधिकारी) यांच्यासाठी एकूण बिलाच्या ९.५ टक्के प्रमाणे १५,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केली.
पडताळणी व सापळा कारवाई:
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०२/११/२०२६ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, आरोपींनी बिलावर सही करून तडजोडीअंती ९ टक्के प्रमाणे १०,०००/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शवली.
त्यानुसार आज (दि. ०२) उपविभागीय अधिकारी, बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद जळगाव येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी भगवत चवरे यांनी तक्रारदाराकडून १०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारूनआरोपी सतीश सिसोदिया यांना दिली. दोन्ही आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारून स्वतःकडे बाळगल्याने पंचांसमक्ष जप्त करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू:
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपींच्या अंगझडतीत मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पर्यवेक्षक अधिकारी: श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., जळगाव.
सापळा अधिकारी: श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार कॅम्प, जळगाव.
मार्गदर्शन: मा. श्री. भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र), मा. श्री. प्रदीप मैराळे व मा. श्रीमती कविता फदतरे (अप्पर पोलीस अधीक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांसाठी आवाहन:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव येथील कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर (0257-2235477, 7588661064) संपर्क साधावा.

