रेशनपासून वंचित पात्र लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ; ४५ दिवसांत मिळणार धान्याचा लाभ.

अपात्र लाभार्थ्यांची चौकशी होणार..
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता. १२ शासनाच्या ‘मिशन सुधार’ प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यात शिधापत्रिकांमधील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि नावे वगळण्याची मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर जे खरे पात्र नागरिक आजही सार्वजनिक वितरण व्यवस्थेपासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी जिल्हा पुरवठा शाखेने अर्ज करण्याची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव – पुरवठा शाखेच्या आवाहनानुसार यावल तालुक्यातील अशा पात्र नागरिकांनी तात्काळ अर्ज करावा असे आवाहन यावल पुरवठा विभागाने केले आहे.
कोणाला मिळणार लाभ ? • ज्यांच्याकडे अद्याप शिधापत्रिका (रेशन कार्ड) नाही • विभक्त कुटुंब झालेले, परंतु स्वतंत्र कार्ड न मिळालेले • लग्नानंतर नाव समाविष्ट न झालेले • नव्याने स्थलांतरित झालेले पात्र कुटुंब • अंत्योदय, प्राधान्य कुटुंब (PHH) व दारिद्र्यरेषेखालील पात्र लाभार्थी
अशा नागरिकांची अर्जानंतर पडताळणी होऊन, ४५ दिवसांच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ सुरू करण्यात येणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा करावा ?
ऑनलाईन अर्ज : शासनाच्या RCMS पोर्टलवर – rcms.mahafood.gov.in
यावर ‘नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज’ या पर्यायातून अर्ज करता येईल.
ऑफलाईन अर्ज : यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येईल. कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सर्व कुटुंबीयांचे आधार कार्ड • रहिवासी पुरावा – मतदान ओळखपत्र / वीज बिल / भाडे करार • उत्पन्नाचा दाखला / उत्पन्नाबाबत स्वघोषणापत्र कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो • मोबाईल नंबर व बँक तपशील (आधारशी लिंक असलेला) • जुने रेशन कार्ड असल्यास त्याची प्रत / नाव वगळल्याचा पुरावा
कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो, त्यामुळे अर्जदारांनी सर्व कागदपत्रे तपासूनच अर्ज सादर करावा, अशी सूचना पुरवठा विभागाने दिली आहे.
‘मिशन सुधार’ म्हणजे काय ?
जिल्ह्यात अनेक शिधापत्रिकांमध्ये मृत व्यक्ती, स्थलांतरित, दुबार नावे, तसेच आर्थिकदृष्ट्या अपात्र व्यक्तींची नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचत नाही. ही अनियमितता दूर करण्यासाठी शासनाने ‘मिशन सुधार’ हाती घेतले आहे. यात अपात्रांची नावे वगळली जाणार असून, त्याच जागी पात्र व गरजू लाभार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे.
यावलकरांना पुरवठा विभागाचे आवाहन
“यावल तालुक्यातील एकही पात्र कुटुंब रेशनपासून वंचित राहू नये,यासाठी ही मोहीम आहे. पात्र नागरिकांनी दलालांच्या मागे न लागता थेट RCMS पोर्टलवर किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज करावा. अर्जाची पडताळणी पारदर्शकपणे होईल.”
पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, यावल
तसेच ज्या नागरिकांचे e-KYC अपूर्ण आहे, त्यांनीही तात्काळ e-KYC पूर्ण करून घ्यावे, अन्यथा धान्य वितरणात अडचण येऊ शकते.
पात्र असूनही अद्याप रेशनपासून वंचित असाल, तर हीच योग्य वेळ आहे. आजच अर्ज करा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्या.
यावल तालुक्यात काही अपात्र लाभार्थ्यांनी पुरवठा विभागात पैशांची पेरणी करून धान्य मिळण्याची व्यवस्था केली आहे
याकडे पुरवठा निरीक्षक पुरवठा अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याची सुद्धा तालुक्यात चर्चा आहे.

