थोरगव्हाण केंद्रात रायपूर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे तिसरे पुष्प उत्साहात संपन्न!pनिपुण महाराष्ट्र, निपुण भारत, नवीन शैक्षणिक धोरण २०२० आणि आनंददायी शिक्षणावर सखोल मार्गदर्शन; ऑनलाइन माहिती भरण्याचे प्रात्यक्षिक

सावदा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
थोरगव्हाण केंद्रात रायपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे तिसरे पुष्प उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह अध्यापनातील नवनवीन संकल्पना, शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायपूर येथील चिमुकल्या विद्यार्थिनींनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. रोहितजी सोनवणे साहेब, शालेय पोषण आहार अधीक्षक श्री. रविंद्रजी बखाल साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती संगीता पाटील मॅडम आणि थोरगव्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. उत्तम माळी साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. राजेंद्र दुर्गादास पाटील होते.
परिषदेच्या सुरुवातीला निपुण महाराष्ट्र अभियानाचा आढावा घेण्यात आला. निपुण भारत कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्री. अमोल बडगुजर सर यांनी दिली. पाठ नियोजन या विषयावर श्री. समाधान पाटील सर यांनी मार्गदर्शन केले, तर मूल्यवर्धन उपक्रम प्रशिक्षण श्री. मयूर पाटील सर यांनी दिले. तसेच स्थानिक शैक्षणिक विषयांवर केंद्रप्रमुखांनी सखोल मार्गदर्शन केले.
या परिषदेत विविध शासकीय व शैक्षणिक ऑनलाइन माहिती कशा पद्धतीने भरावी, त्यातील आवश्यक बाबी कोणत्या आहेत, याबाबत शिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. ऑनलाइन माहिती वेळेत व अचूक भरण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यामुळे शिक्षकांना दैनंदिन शैक्षणिक कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मदत झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र दुर्गादास पाटील यांनी सर्व केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनींच्या वतीने केंद्रप्रमुखांना आश्वस्त केले की, केंद्राच्या शैक्षणिक कामकाजासाठी व विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांकडून वेळोवेळी संपूर्ण सहकार्य केले जाईल. तसेच ऑनलाइन माहिती सादर करताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व शिक्षक घेतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षण परिषदेचे महत्त्व अधोरेखित करताना सद्यःस्थितीत शाळांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक समस्या सामूहिक समन्वयातून सोडविणे, केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनींमध्ये विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे आणि एका शाळेतील चांगले शैक्षणिक उपक्रम इतर शाळांमध्येही विस्तारित करणे, हा शिक्षण परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा कशी घडवून आणता येईल आणि अध्यापन प्रक्रिया अधिक विद्यार्थी-केंद्रित कशी करता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः या शिक्षण परिषदेत आनंददायी शिक्षणाची संकल्पना प्रामुख्याने दिसून आली. विद्यार्थ्यांना कृती, अनुभव, सहभाग आणि आनंदातून शिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला.
शिक्षण परिषदेच्या तिसऱ्या पुष्पाचे उत्कृष्ट नियोजन, सुयोग्य व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायपूर येथील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन तसेच उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले.
एकंदरीत, शिक्षकांमधील समन्वय, सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा सकारात्मक संदेश या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेतून देण्यात आला.
या परिषदेस थोरगव्हाण केंद्रातील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. युवराज कुरकुरे व श्री. किरण चौधरी यांची उपस्थिती लाभली.

