भुसावळ येथे सचखंड एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग चोरी ; लाखो रुपयांचे मुद्देमाल लंपास !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यावर कोणते स्टेशन आले? हे पाहण्यासाठी दरवाजात गेलेल्या महिलेची सीटखाली ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २० मे रोजी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली. या बॅगेमध्ये अंदाजे १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज होता. ही महिला भोपाळ ते जळगाव असा प्रवास करत होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनमाड येथील रहिवासी कौशल्या शंकर पाटील त्यांच्या एका मैत्रिणीसोबत १२७१६ क्रमांकाच्या सचखंड एक्स्प्रेसने भोपाळ ते जळगाव असा प्रवास करत होत्या. मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ गाडी आली. यावेळी कोणते स्टेशन आले आहे? हे पाहण्यासाठी कौशल्या पाटील डब्याच्या दरवाजात गेल्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने सीटखाली ठेवलेली त्यांची बॅग लांबवली.
पाटील या इंजिनजवळील पुढील जनरल डब्यात बसून प्रवास करत होत्या. बॅगेत रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने, मोबाइल, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, पासबुक आणि इतर कागदपत्रे मिळून एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज होता. कौशल्या पाटील यांनी तत्काळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायरकर यांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. चोरीची घटना घडली तेव्हा गाडीतून कोण खाली उतरले? याची माहिती घेणे सुरू आहे.