दिव्यांग बांधवांना स्वावलंबनासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन सत्र यावल येथे यशस्वी.

शासनाच्या योजना मिळाल्या तर दिव्यांग देखील यशस्वी उद्योजक बनू शकतात” : ललित तायडे.
यावल दि. ४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने यावल येथे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. शेतकी खरेदी विक्री संघ सभागृहात आज सकाळी ११:३० वा.जिल्हा उद्योग निरीक्षक ललित गोविंदा तायडे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व संवाद सत्र पार पडले.
या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), दिव्यांगांसाठी विशेष कर्ज योजना, तसेच उद्योग संचालनालय मार्फत मिळणाऱ्या सवलती, यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
ललित तायडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शासकीय योजना प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाकडे भरपूर योजना आहेत, पण माहितीअभावी त्या पोहोचत नाहीत. आपण त्यांना फक्त आधार नाही तर दिशा देण्यासाठी येथे आलो आहोत.”
कार्यक्रमात प्रहार जनशक्ती संघटनेचे सल्लागार शरद बारजीभे, हरिभाऊ पाटील, रत्ना पाटील, प्रवीण सोनवणे, तसेच तालुक्यातील विविध गावांमधून आलेले दिव्यांग बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
या संवाद सत्रात दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या व्यवसायाच्या कल्पना, येणाऱ्या अडचणी, तसेच शासकीय कार्यालयांमधील प्रक्रियेबद्दलचे अनुभव खुलेपणाने मांडले. काहींनी म्हटले की कर्ज मिळवताना पुरावे सादर करणे, हमीदार मिळवणे, तसेच प्रशिक्षण सत्रांमध्ये जाणे या बाबतीत अडचणी येतात.
. तायडे यांनी सांगितले की, उद्योग संचालनालयाकडून दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाचे समारोप करताना शरद बारजीभे यांनी सांगितले, “दिव्यांगांना मदत ही केवळ सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या हक्काने मिळाली पाहिजे. असे उपक्रमच खऱ्या अर्थाने दिव्यांगांना सक्षम करतात.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकी खरेदी विक्री संघ,आणि स्थानीय दिव्यांग संघटनांचे योगदान मोलाचे ठरले.

