Friday, June 13, 2025
Homeजळगावभरदिवसा 3.25 लाखांची धाडसी चोरी – नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासनाकडून कडक...

भरदिवसा 3.25 लाखांची धाडसी चोरी – नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा

भरदिवसा 3.25 लाखांची धाडसी चोरी – नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा

मुक्ताईनगर प्रतिनिधी. खानदेश लाईव्ह न्युज

मुक्ताईनगर शहरात भरदिवसा 3.25 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. निमखेडी खुर्द येथील रहिवासी रतन कडू घोडकी यांच्यासोबत ही फसवणूक झाली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रतन कडू घोडकी हे शेती आणि प्लंबिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. आज, दिनांक 12 जून 2025 रोजी, सकाळी ते मुक्ताईनगर शहरात प्लॉट खरेदीसाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी आले होते. त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेमधून दुपारी 12:40 वाजता 2.25 लाख रुपये आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक मुक्ताईनगर येथून 12:55 वाजता 1 लाख रुपये रोख काढले. एकूण 3.25 लाख रुपयांची रक्कम त्यांनी जवळच्या कापडी पिशवीत ठेवली होती.

रक्कम काढल्यानंतर ते मोटरसायकलवरून घरी जाण्यास निघाले. मात्र, बँकेच्या गेटबाहेर एक अनोळखी इसमाने त्यांना “तुझे खिशातील पैसे खाली पडले आहेत” असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. खाली पडलेले पैसे उचलण्यासाठी ते खाली उतरले असताना, त्यांच्या मोटरसायकलच्या हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी चोरट्यांनी लंपास केली.

घटनेची माहिती समजताच त्यांनी चोरट्याचा पाठलाग करत बोदवड चौफुलीपर्यंत धाव घेतली. मात्र, चोरटे कुठेच दिसले नाहीत. नंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, दिवसा ढवळ्या बँकेबाहेरच चोरी होणं हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तत्काळ तपास करून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या