महिला व तिच्या नातेवाईकावर चाकू हल्ला : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ, दि. १२ जून २०२५ :
शिवाजी नगरजवळील आगाखान वाडा परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. फिर्यादी सुलताना अहमद कुरेशी (वय ४३), गृहिणी, यांच्या फिर्यादीवरून गुलाम, त्याचा लहान भाऊ आवेश आणि काका दस्तगीर उर्फ पप्पू यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलताना कुरेशी यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या कुटुंबासह शिवाजी नगरजवळ वास्तव्यास असून, रात्रीच्या सुमारास लहान मुलगा जयान यास जेवणासाठी बोलवण्यासाठी त्या घरासमोरील बालवाडी परिसरात गेल्या असता, त्याठिकाणी गुलाम हा संशयित आरोपी अचानक समोर आला आणि त्याने सुलताना यांच्या हाताला पकडून त्यांना आत ओढण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्यावर भाचा साहील शेख (वय २७) धावत आला व त्याने हस्तक्षेप केला.
या झटापटीदरम्यान गुलाम याने कमरेतील चाकू काढून सुलताना यांच्या पाठीवर वार केला आणि साहील यांच्या डाव्या हातावर चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केले. दरम्यान, पती अहमद कुरेशी व मोठा मुलगा जिशान यांनी धावत येऊन हस्तक्षेप केला. कलीम मन्यार नामक इसम भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्यावर तोही किरकोळ जखमी झाला. त्यानंतर गुलामचा काका दस्तगीर उर्फ पप्पू व लहान भाऊ आवेश हे घटनास्थळी येऊन शिवीगाळ व धमकी देऊ लागले.
जखमी सुलताना व भाचा साहील यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सुलताना कुरेशी यांच्या तक्रारीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार तांतीलाल केदारी करीत आहेत.