डुक्कर आडवे आल्याने दुचाकी अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
ऑडनस फॅक्टरी रोडवरील साईबाबा मंदिराजवळ सकाळच्या सुमारास दुर्दैवी घटना
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरातील ऑडनस फॅक्टरी रोडवरील साईबाबा मंदिरासमोर शुक्रवार, २० जून रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी अपघातात एक तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मृत व्यक्तीचे नाव मंगेश दिलीप बिजागरे (वय ३५, रा. काशीराम नगर, भुसावळ) असे आहे. तो हिरो होंडा फॅशन प्रो (क्र. एम एच-१९ बीबी-७७९९) या दुचाकीने झोनल रेल्वे ट्रेनिंग सेंटर येथे सकाळचा नाश्ता पोचवण्यासाठी निघाला होता. दरम्यान, साईबाबा मंदिराजवळ अचानक त्याच्या दुचाकीसमोर डुक्कर आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी स्लिप होऊन डिव्हायडरला जोरदार धडक बसली.
या धडकेत मंगेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अति रक्तस्त्रावामुळे तो जागीच मृत्यूमुखी पडला.
या प्रकरणी ईश्वर दिलीप बिजागरे यांच्या खबरीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याप्रकरणी पोलीस हवालदार गजानन बडगुजर पुढील तपास करीत आहेत.