मेस्को कामगारांचा विजयदिवस! मंत्री संजय सावकारेंच्या पुढाकारामुळे माजी सैनिकांच्या मागण्यांना न्याय
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दि. २१ जून २०२५ रोजी हिरा मारुती फुलगाव येथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को च्या वतीने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ धार्मिक किंवा सामाजिक नव्हता, तर एका लढ्याच्या यशाची ग्वाही देणारा भावनिक सोहळा होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय भाऊ सावकारे उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष मा. मुरलीधर उर्फ गोलू पाटील व आपल्या परीसरातील जेष्टपत्रकार राजेश निकम यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
दीपनगर येथील मेस्कोच्या सुरक्षा विभागात कार्यरत माजी सैनिक गेली अनेक वर्षे दोन प्रमुख प्रश्नांवर संघर्ष करत होते — समान कामासाठी समान वेतन आणि सेवानिवृत्ती वयातील तफावत. 58, 60 आणि 65 या वयाच्या गोंधळामुळे अनेकांना अन्यायकारक निवृत्तीला सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात मेस्कोचे कामगार संघटनांचे नेतृत्व सतत आंदोलने, निवेदने आणि उपोषणाच्या माध्यमातून संघर्ष करत होते.या दीर्घकाळ संघर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री संजय सावकारे यांनी पुढाकार घेत, माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराज देसाई यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
१. समान कामाचा समान मोबदला या तत्वानुसार मेस्को प्रशासनाने नवीन वेतन प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर मंजुरीसाठी पाठवावा.
२. सेवानिवृत्ती वयात एकरूपता आणून ५८, ६० व ६५ अशा गोंधळात टाकणाऱ्या नियमांऐवजी एकसंध व स्पष्ट धोरण लागू करावे, जे माजी सैनिकांच्या हिताचे ठरेल.