Monday, June 30, 2025
Homeगुन्हाआंतरजिल्हा टोळीला ठोकल्या बेड्या! खिसे कापणाऱ्याचा जळगाव येथे पर्दाफाश !

आंतरजिल्हा टोळीला ठोकल्या बेड्या! खिसे कापणाऱ्याचा जळगाव येथे पर्दाफाश !

आंतरजिल्हा टोळीला ठोकल्या बेड्या! खिसे कापणाऱ्याचा जळगाव येथे पर्दाफाश !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी ४ वाजता अमरावती जिल्ह्यातील तीन संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, पाच मोबाइल आणि एक कार असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना या टोळीवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, अमरावती येथील काही रेकॉर्डवरील खिसेकापू गुन्हेगार बसस्थानक परिसरात सक्रिय आहेत. त्यांनी ही माहिती तत्काळ वरिष्ठांना दिली. नवीन बसस्थानकात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाच्या पॅन्टच्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील रहिवासी असलेले गोपाल किसन बारी (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह जळगावला आले होते. २४ जून रोजी सायंकाळी ते पत्नीसोबत नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये काढून घेतले. आपले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच गोपाल बारी यांनी दुसन्या दिवशी, २५ जूनला सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल अनिता वाघमारे करत आहेत.

पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी दुपारी कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे अहमद बेग कादर बेग (वय ६२), हफिज शाह हबीब शाह (वय ४२) आणि अजहर हुसेन हफर हुसेन (वय ४९) अशी अमरावती जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. तिघांनीही बसस्थानकात खिसे कापून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोर्पीच्या झडतीत पोलिसांना ३३ हजार ८३० रुपयांची रोकड, १७ हजार ५०० रुपयांचे पाच मोबाइल फोन, एक रेक्झिन बॅग आणि ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या