मध्यरात्री चोरट्यांनी वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी वाहनात भरून ठेवलेल्या चार लाख दोन हजार ७५ रुपये किमतीच्या सिगारेट चोरट्यांनी लांबविल्या. हा प्रकार २७जून रोजी रात्री ते २८ जून सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, नवीपेठ परिसरात चंद्रशेखर जवरीलाल राका (५०, रा. नवीपेठ) यांचे सी. जे. ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. दिवसभरात जिल्हाभरातून आलेल्या ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे सायंकाळी गाडीत माल भरून हे वाहन गोविंदा रिक्षा थांब्याजवळ उभे केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑर्डरप्रमाणे सिगारेट व इतर मालाचा पुरवठा केला जातो. २७जून रोजी मालवाहू वाहनात (क्र. एमएच. १९, सीवाय. ०१२३) माल भरून हे वाहन रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा थांब्याजवळ उभे केले होते. त्यानंतर रात्रीतून चोरट्यांनी वाहनाच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यातून वेगवेगळ्या सिगारेट कंपनीची तब्बल सहा हजार १९० पाकिटे चोरून नेली. त्यांची किंमत चार लाख दोन हजार ७५ रुपये आहे.शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करीत फुटेज ताब्यात घेतले. फुटेजमध्ये चोरटे चोरी करताना कैद झाले असून, ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे. दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी सकाळी ९ वाजता चालक शंकर जाधव हे वाहनाजवळ आले त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मालक चंद्रशेखर राका यांना माहिती दिली. राका यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुनील पाटील करीत आहेत.