वारकऱ्यांची वारी मुक्ताईच्या दर्शनाने झाली पूर्ण; लाखो भक्तांचे श्रीक्षेत्र कोथळी येथे आगमन
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी (जि. जळगाव), ता. २१ जुलै :
श्रीक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल दर्शनानंतर आपली पारंपरिक वारी पूर्ण केल्यानंतर आई मुक्ताईंच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज श्रीक्षेत्र कोथळीतील श्री संत मुक्ताई मंदिरात हजेरी लावली. या पावन क्षणाच्या साक्षीने वारकऱ्यांची वारी पूर्णत्वास गेली.
“मुक्ताईचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही,” या दृढ श्रद्धेने प्रेरित होऊन वारकरी सकाळपासूनच रांगेत उभे राहून आपल्या पालख्या, टाळ-मृदंगांच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “मुक्ताई माऊली की जय” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हालेला दिसत होता.
यावेळी मंदिर समिती व प्रशासनाकडून भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्थाही करण्यात आली होती. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय मदत केंद्रे आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांसाठी खास उपवास फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
विशेष आकर्षण ठरले ते श्रीक्षेत्र कोथळी येथील नितीन रघुनाथ चौधरी यांच्या शेतातील मोसंबीपासून सजवलेली मुक्ताई माऊलींची आकर्षक आरास.
तसेच सकाळी भाविकांसाठी डाॅ. विजय पाटील (नायगाव), श्री जिवन चौधरी (विरोधा) आणि अमोल पाटील (कोचुर) यांच्यावतीने १० क्विंटलपेक्षा जास्त साबुदाणा फराळ खिचडीचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
श्रीक्षेत्र पंढरपूरपासून श्रीक्षेत्र कोथळीपर्यंतची वारी आणि मुक्ताईंच्या दर्शनाने वारकऱ्यांच्या भक्तीला एक पूर्णत्व लाभले.
या वारीचा उत्सव पुढील वर्षीही अशाच भक्तिभावाने पार पडो,हीच मुक्ताई माऊली चरणी प्रार्थना.