आकाशवाणी चौकात प्रांताधिकाऱ्यांनी सुसाट ‘हायवा’वर केली कारवाई !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे सीम येथील गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची उचल केली आणि मुदतबाह्य पावती दाखवत ‘हायवा’ वाहन सुसाट जळगावकडे निघाले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एरंडोलच्या तलाठ्याने पाठलाग करूनही फायदा झाला नाही. म्हणून या सुसाट ‘हायवा’ला जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी आकाशवाणी चौकात रोखले. पावती बोगस निघताच वाहनासह ८ ब्रास वाळूचा साठा जप्त केला.
बुधवारी दुपारी वाळूमाफियांच्या टोळक्याने एरंडोल तालुक्यातून वाळूची बेकायदा उचल केली. वाहन महामार्गावर मार्गस्थ झाले. तेव्हा ते सुसाट धावत गेले. त्यामुळे दुचाकीस्वार तलाठ्याचा नाइलाज झाला. त्यांनी एरंडोल तहसीलदारांना माहिती कळविली. त्यानुसार एरंडोल तहसीलदारांनी जळगाव प्रांताधिकाऱ्यांना ही घटना कळविली. त्यानुसार प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, नायब तहसीलदार बी.व्ही. जाधव, मंडळाधिकारी छाया कोळी यांच्यासह सहकारी आकाशवाणी चौकात दाखल झाले. वाळूने भरलेले वाहन आल्यानंतर त्याला रोखले.