मालमत्ता करावरील व्याज माफीच्या अभय योजनेस मुदतवाढ मिळावी :
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी.
यावल दि.१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नगरविकास विभाग व जळगाव जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार यावल नगरपालिका हद्दीतील मिळकत मालमत्ता करावरील शास्ती / व्याज माफ करणेकामी अभय योजना राबविण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला होता. तरी या योजनेचा लाभ घेण्याकरिता यावल नगरपालिकेने १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. वरील कालावधीत यावल नगरपालिकेत अपेक्षीत रक्कम वसुल न झाल्याने सदर योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरविकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे आदेशानुसार नगरपालिका हद्दीतील मिळकत मालमत्ता करावरील शास्ती व्याज माफ करणेकामी अभय योजना राबविण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला होता.या योजनेचा लाभ घेण्याकरिता १५ जुलै ते ३१ जुलै २०२५ या पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तथापि यावल पालिकेने २० जुलै या दिवशी योजनेसंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. सदर योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात न आल्याने पात्र लाभार्थी अभय योजनेपासुन वंचित आहेत. वरील दिलेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत फक्त ५ लक्ष रुपये एवढी अल्प रक्कम वसुल झाली आहे.यावल पालिकेची शहरातील मिळकतधारक यांचेकडे सुमारे चार ते साडे चार कोटी रुपये एवढी रक्कम थकीत आहे. थकीत रकमेच्या तुलनेत वसुल करण्यात आलेली रक्कम अल्पप्रमाणात असून या योजनेला मुदतवाढ देणेकामी मुख्याधिकारी यांनी जिल्हास्तरावरून परवानगी मिळवुन तिन आठवडे मुदत वाढवावी अशी मागणी अतुल पाटील यांनी केली आहे. जास्तीत जास्त थकीत मालमत्ता कराची रक्कम वसुल होण्यासाठी नगरपालिकेने थकबाकी धारकांना पत्र देऊन अभय योजनेबाबत अवगत करून योजनेचा पुरेपूर लाभ देऊन वसुली वाढवावी असे निवेदन देण्यात आले आहे.