पाच दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळला इसमाचा मृतदेह
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी चप्पल घेण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा पाच दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जळगाव विमानतळाच्या मागील बाजूस शेताच्या बांधावर आढळून आला. रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्य प्रदेश, सध्या रा. कुसुंबा) असं मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.रामू वास्कले हा पत्नी व मुलांसोबत कुसुंबा येथे वास्तव्यास होता. तो गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून काम करत होता आणि तिथेच राहत होता. २६ जुलै रोजी तो पत्नीला गावातून चप्पल घेण्यास जातो असे सांगून घरातून निघाला; मात्र रात्री उशिरापर्यंतही परतला नाही. ३१ जुलै रोजी सकाळी नशिराबाद शिवारातील विमानतळामागे असलेल्या आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर रामू वास्कले याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह जीएमसीत दाखल केला. रामूच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.