धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती साजरी

फैजपूर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रंथपाल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमात डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रातील योगदानाला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उप प्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी ग्रंथालय समिती समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, उपप्राचार्य डॉ. हरिष नेमाडे, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील तसेच प्रा. दीपक सूर्यवंशी, डॉ. मच्छिन्द्र पाटील, प्रा. डॉ. सतीश पाटील, प्रा. डॉ. सविता वाघमारे, प्रा. डॉ. आय पी ठाकूर प्रा. विजय तायडे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रंथालय समितीचे समन्वयक प्रा. डॉ राजेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजून सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, नेपोलियन यांच्या वाचनाबद्दल असलेल्या मतांचा उल्लेख करून वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा गौरव करताना अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुरवाडे यांनी ‘ग्रंथालय ही चैनीची वस्तू नसून जीवनावश्यक गरज आहे,’ या विचारावर भर दिला. ‘ग्रंथालय हे ज्ञानाचे दालन आहे’ या विषय विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. डॉ. रंगनाथन यांची ग्रंथालय शास्त्रासाठी मांडलेले पाच मूलभूत सिद्धांत आजही मार्गदर्शक ठरत आहेत असेही आपल्या भाषणात सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नयना नरेंद्र पाटील आणि हेमंत येवले यांनी उत्स्फूर्तपणे आपले वाचनाचे अनुभव मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल श्री आय. जी. गायकवाड यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. यू. आर. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सहर्ष चौधरी, सौ सुरेखा सोनवणे सौ यामिनी पाटील यांनी परिश्रम घेतले.

