भुसावळ बसस्थानक परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ बसस्थानकाच्या मागील भिंतीजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जय दिपक चावरिया (वय ३७, रा. वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता ड्युटी संपवून घरी जाताना त्यांनी एका अनोळखी इसमाला बसस्थानकातून बाहेर काढले होते.
१३ ऑगस्ट रोजी सकाळी चावरी या ९.३० वाजता ड्युटीवर असताना बिस्कीट विक्रेता संजय म्हैसाळ यांनी चावरिया यांना बसस्थानकाच्या मागील भिंतीजवळ एक इसम पडलेला असल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने चावरिया, म्हैसाळ आणि गणेश भट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, इसम हालचाल करत नसल्याने तो मृत असल्याची खात्री झाली.
मयताचे अंदाजे वय ४० वर्षे असून , शरीराने मजबूत, उंची सुमारे ५.६ फूट, चेहरा लांबट, काळी वाढलेली दाढी, उजव्या हातात लाल धागा, कमरेला करदोळा, अंगात राखाडी पँट, पिवळा फुलबाही शर्ट आणि फिकट हिरव्या रंगाची निकर परिधान केलेला होता.
सदरची घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते १३ ऑगस्ट सकाळी ९.३० या वेळेत घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

