सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहितेचा स्वातंत्र्य दिनी आत्महत्येचा प्रयत्न !

महिला आयोगाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने घेतली टोकाची भूमिका .
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता. भुसावळ दि १५ ऑगस्ट : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून कोमल शुभम बोदोडे या सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
सध्या त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
विशेष म्हणजे कोमल बोदोडे यांनी काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीकडे दखल न घेतल्याने न्याय न मिळण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
धक्कादायक आरोप –
कोमल हिचा विवाह ३ एप्रिल २०२४ रोजी भुसावळ येथील शुभम राजेंद्र बोदोडे यांच्यासोबत बौद्ध पद्धतीने झाला होता. विवाहानंतर सासरी अंधश्रद्धेच्या नावावर मानसिक छळ, मानहानी आणि जबरदस्ती सुरू झाली.पती,सासू,नणंद आणि देवर यांनी मिळून त्यांना घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, “लेकरू पाडा” आणि “हिचं दुसरं लग्न लावा” अशा अमानवी भाषा वापरण्यात आल्याचे कोमल यांनी सांगितले. तीन महिन्यांपासून त्या माहेरी राहत असून, आधार कार्ड व इतर ओळख पुरावे अडवले गेले आहेत.
न्यायाच्या शोधात निराशा –
कोमल यांनी २४ जून २०२५ रोजी महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. सुनावणीसाठी ८ आणि १० जुलै रोजी पती व त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले होते.मात्र,या सुनावणीतच कोमल यांना शिवीगाळ व धमकावण्यात आले,असा दावा त्यांनी केला आहे.संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
“आत्महत्येची परवानगी द्या असे संतप्त पत्र
कोमल यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महिला आयोग व पोलिसांना लिहिलेल्या पत्रात
“जर या स्वातंत्र्यदिनीही मी सुरक्षित नाही, तर कृपया मला आत्महत्येची परवानगी द्या,”
असा संतप्त सवाल करत आपली व्यथा मांडली आहे.
प्रशासनाचा उशिरा जागवलेला प्रतिसाद –
कोमल हिने विषारी औषध सेवन केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
समाजाला हादरवणारी घटना –
ही घटना केवळ कोमल बोदोडे यांची वैयक्तिक शोकांतिका नसून, संपूर्ण समाजाच्या महिलांच्या सुरक्षेवर आणि न्यायप्राप्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महिला हक्क संघटनांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

