Friday, October 17, 2025
Homeजळगावभागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

तीन हजार पाचशे कोटींची प्रशासकीय मान्यता

जळगांव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे.

या आढावा बैठकीस सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता प्रल्हाद वराडे, उप अभियंता चंद्रशेखर खंबायत आदी अधिकारी उपस्थित होते. भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण किंमत ३५३३.०५ कोटी असून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेतून जामनेर व पाचोरा तालुक्यातील ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे लाभक्षेत्र स्थिर केले जाणार असून एकूण ९८.३५ दलघमी पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्याद्वारे जळगाव तालुक्यातील १३,९०४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळेल. प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. टप्पा-१ अंतर्गत जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, देव्हारी आदी २६ गावांतील १३,९०४ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर टप्पा-२ अंतर्गत ४४.५ किलोमीटर लांबीच्या उद्धरण नलिकेद्वारे व १८,४६७ अश्वशक्तीच्या पंपांद्वारे ९८.३५ दलघमी पाणी उचलून जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम तसेच जळगाव तालुक्यातील २ लघु अशा एकूण ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठवले जाणार आहे. यामध्ये कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प नव्याने तसेच एकुलती सा.त. प्रकल्प नव्याने उभारण्याचाही समावेश आहे. या टप्प्यातून १६,८६० हेक्टर क्षेत्राचे स्थिरीकरण होणार आहे. या प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. प्रकल्पाच्या कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेऊन काम तातडीने सुरू करण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या