आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांतून यावल येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ४४ लाखांचा निधी मंजूर.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१६
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत यावल नगरपरिषदेला ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील स्मशानभूमीचा विकास आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून,परिसर अधिक स्वच्छ आणि सुसज्ज होणार आहे.
स्मशानभूमी हे प्रत्येक नगरातील आवश्यक व संवेदनशील ठिकाण असून,येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा, सावली, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि सौंदर्यपूर्ण वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या निधीच्या मंजुरीसाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागांशी चर्चा करत ही मागणी शासनदरबारी मांडली आणि अखेर निधी मंजूर झाला.
शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनेही प्रकल्पांना प्राधान्य मिळावे, या उद्देशाने आमदार अमोलभाऊ जावळे यांनी हा प्रश्न सातत्याने शासनपातळीवर मांडला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून यावल शहरात आता स्वच्छ, सुसज्ज आणि आदर्श स्मशानभूमी उभारली जाणार आहे. या मंजुरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.