जिल्ह्यात पावसाचा कहर : पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह !
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवार व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर ते चोपडा रस्त्यावर पातोंडा- नांद्रीला जोडणाऱ्या लवण नाल्याला पूर आला होता. यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, पातोंडा व नांद्री येथील पारधी वाडा, भिल्ल वस्ती व सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात पुराने वेढा घातला होता. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय ५५) यांचा पाय घसरून ते पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती. या घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पथकाने त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा तपास लागला नव्हता. तर ग्रामस्थांनी पोहणाऱ्या व्यक्तींना ही शोध घेण्यास सांगितले होते. मात्र, दोन दिवसांपर्यंत त्यांच्याविषयी कोणतीच माहिती मिळाली नव्हती. शेवटी मंगळवारी दुपारच्या सुमारास ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी लागलीच पोलिसांना ही सूचना देऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.
पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जी. एम. पाटील यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. लागलीच सायंकाळी शोकाकूल वातावरणात सर्जेराव बिरारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्जेराव पाटील हे घरातील कर्ते पुरुष होते. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.