दीपनगरात ठेकेदारांविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी फेकरी ता.भुसावळ दीपनगर व परिसरातील स्थानिक बेरोजगारांच्या हक्कासाठी ठेकेदारांविरोधात तीव्र आंदोलन उभे राहिले आहे. २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून फेकरी मेन गेट, दीपनगर येथे स्थानिक सुशिक्षित युवक दीपक सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात झाली.
उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, दीपनगर प्रकल्पातील ठेकेदार धर्मेश पटेल, उमेश पाटील, दीपक पाटील, धर्माधिकारी, प्रभाकर सोनवणे, प्रिन्स एंटरप्राइजेस, एस.पी. पाटील, महाबळ, एस.आर. कंपनी आदींनी स्थानिक युवकांना रोजगार नाकारून बाहेरील लोकांना वशिलेबाजीवर कामावर घेतले आहे. पावर हाऊसचा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींना सुपरवायझर व साईड इन्चार्ज पदावर नियुक्त केले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
“स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास जगायचे की मरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदारांची हुकूमशाही संपवून बेरोजगारांना न्याय मिळेपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील,” असा निर्धार दीपक सुरवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या उपोषणाला मोठ्या संख्येने स्थानिक बेरोजगार व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

