Thursday, November 19, 2026
Homeजळगावब्लॉग लेखन स्पर्धेत यावलच्या लिना सपकाळे हिने पटकावला राज्यात तृतीय क्रमांक

ब्लॉग लेखन स्पर्धेत यावलच्या लिना सपकाळे हिने पटकावला राज्यात तृतीय क्रमांक

ब्लॉग लेखन स्पर्धेत यावलच्या लिना सपकाळे हिने पटकावला राज्यात तृतीय क्रमांक

गडचिरोली येथील जनजातीय गौरव दिन महोत्सवात ७० हजार रुपयांचे पारितोषिक; जळगाव जिल्ह्याचा सन्मान

जळगाव,     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    : गडचिरोली येथे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत येणाऱ्या कोसगाव (ता. यावल) येथील लिना संजीव सपकाळे हिने ब्लॉग लेखन स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील आदिवासी युवतीने राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशामुळे यावल प्रकल्पासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती, लोककला, रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

ब्लॉग लेखन स्पर्धेत राज्यभरातील एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यस्तरीय गुणांकन समितीमार्फत निर्धारित निकषांनुसार सर्व सहभागी स्पर्धकांच्या लेखनाचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह दोन स्पर्धकांची प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. यामध्ये यावल प्रकल्पातील लिना संजीव सपकाळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पद्मश्री चैत्राम पवार तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निकेश सागर (भा.प्र.से.) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवक-युवतींमध्ये विविध कलागुण, सर्जनशीलता आणि लेखनकौशल्य दडलेले असते. त्यांना योग्य व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, हे लिना सपकाळे हिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. तिचे हे यश यावल प्रकल्प क्षेत्रासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नवोदित युवक-युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

लिना सपकाळे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या