वरणगावचे तलाठी कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ , दि १८ऑगस्ट :
वरणगाव शहराच्या मध्यवर्ती रामपेठ चौकात असलेल्या तलाठी कार्यालयावर अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला आहे.
केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमण वाढत असून नागरिक आणि वाहनधारक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.महसूल विभाग व नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे हे अतिक्रमण असून त्यांना कुठलाही प्रशासनिक आळा बसलेला नाही.
सुरुवातीला ग्रामपंचायत इमारतीत असलेले हे तलाठी कार्यालय शहराच्या वाढत्या विस्तारामुळे २००३-०४ मध्ये रामपेठ चौकात स्थलांतरित करण्यात आले.त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी होमगार्ड कार्यालयाची सुमारे ११ हजार चौरस फुट जागा महसूल विभागाला हस्तांतरित करून नवीन तलाठी कार्यालयासाठी मंजूर केली होती.तत्कालीन तलाठी व कोतवाल यांच्या प्रयत्नातून हे कार्यालय कार्यान्वित झाले.
परंतु गेल्या काही वर्षांत या कार्यालयाभोवती व्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा बळकावल्याने सामान्य नागरिकांना कार्यालयात प्रवेश करताना अडचणी येतात. शिवाय,वाहनतळाची व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात,यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
वाहतुकीची गंभीर समस्या –
रामपेठ चौक आणि बसस्थानक चौक हे दोन्ही मुख्य रस्त्यावरील ठिकाणे कायमस्वरूपी वाहतूक कोंडीने ग्रस्त असतात. आठवडे बाजाराच्या दिवशी या कोंडीत भरच पडते. स्थानिक नागरिक आणि वाहनचालक यामध्ये नाराजीचा सूर वाढत आहे.
अतिक्रमण करण्यासाठी सर्वच अग्रेसर
बसस्थानक ते रामपेठ चौकदरम्यान अतिक्रमणाची स्पर्धा लागली आहे. एखादा दुकानदार एक फूट अतिक्रमण करतो तर दुसरा दोन फूट करून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. ही अतिक्रमणाची साखळी थांबण्याचे नाव घेत नाही आणि स्थानिक प्रशासन डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांची मागणी –
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांना तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. अतिक्रमण हटवून नागरी सेवेसाठी असलेल्या तलाठी कार्यालयाची जागा खुली करणे आणि वाहतुकीच्या अडथळ्यांवर उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे.

