शरीराप्रमाणेच मेंदूचा व्यायाम करा, यश हमखास मिळवा अशोक निकम

वरणगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शरीराचा व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते, त्याचप्रमाणे मेंदूचा व्यायाम केल्यास स्मरणशक्ती वाढते व अभ्यास लक्षात राहतो. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये हमखास यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शरीरासोबतच मेंदूचाही व्यायाम केला पाहिजे, असे प्रतिपादन मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा चे साधक अशोक निकम यांनी केले.
मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा या संस्थेच्या ट्रस्टच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी विद्यालयात विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी यश, निश्चय आणि अभ्यासाच्या युक्त्या या विषयावर अशोक निकम यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, आयुष्यातील यशासाठी चांगले ध्येय निश्चित करून, निश्चयाचे रोपण मनात करावे आणि त्याला सातत्य, एकाग्रता व नियोजनाची जोड दिल्यास नक्कीच चांगले यश मिळते. कठीण विषयही सोप्या पद्धतीने आत्मसात करता येतो.

या कार्यक्रमात विद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांना मनशक्ती तर्फे ‘प्रयत्न रहस्य’ हे पुस्तक विनामूल्य देण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक बी. एम. राठोड, पर्यवेक्षक आर. एस. कोल्हे, पी. एस. झोपे, डी. आर. कोळंबे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले तर आभारप्रदर्शन एस. आर. हळदे यांनी केले.

