वरणगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित
बोदवड व रावेर ला थांबा दिला जातो वरणगाव ला का नाही

वरणगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. दरम्यान, रावेर व बोदवड येथे नव्याने एक्सप्रेस गाड्यांना थांबे मिळाले असताना वरणगावकरांच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
कोरोना काळात बंद करण्यात आलेले काही गाड्यांचे थांबे अजूनही सुरू करण्यात आलेले नाहीत. वरणगाव हे शहर आजूबाजूच्या खेड्यांचे केंद्र आहे. एका बाजूला आयुध निर्माणी, तर दुसऱ्या बाजूला दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र असून आता नव्याने राज्य राखीव पोलीस दलाचे इमारत बांधकाम सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांची संख्या मोठी असूनही थांबे बंदच ठेवण्यात आले आहेत.
माजी नगराध्यक्ष सुनील काळे व प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी यांनी याबाबत वारंवार निवेदने दिली आहेत, वरणगाव करांचे आंदोलन सुध्हा झाले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेजारीच क्रीडामंत्री रक्षा खडसे असूनही वरणगावकरांना रेल्वे थांबा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
राजकीय पातळीवरही हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. वरणगाव शहर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राजकीय बालेकिल्ला राहिले आहे. त्यांचेच सून रक्षा खडसे सध्या केंद्रात मंत्री आहेत. मात्र माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक असून, लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे व काळे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. याचा फटका वरणगाव रेल्वे स्थानकाला बसत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे

