महिला सहायता कक्षाकडून समुपदेशनाने अनेकांचे संसार वेलीवर
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – संसारात विविध कारणांवरून पती-पत्नीत कुरबूर, कौटुंबिक वादाच्या जवळपास दोन हजार तक्रारी महिला सहाय्यता कक्षात येतात. या तक्रारींचा निपटारा करताना येथे नियुक्त पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ येते. सतत प्रयत्न करूनही दोघांकडील मंडळी सामंजस्याची वाट धरत नसतील तर नाईलाज होतो. प्रकरण पोलिस ठाण्यात जाते, तेथून न्यायालय आणि मग कुटुंबाची वाताहत होते. पती-पत्नी विभक्त होऊन आपत्य असले तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशी कौटुंबिक वादाची गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार प्रकरणे पोलिस दलाच्या महिला सहाय्यता कक्षात दाखल झाली आहे.
पूर्वी एकेका घरात आठ ते दहा मुले असायची. आता मात्र आई-वडिलांना दोन किंवा तीन अपत्य असतात. त्यातही वार्धक्यात आई-वडिलांना वाऱ्यावर सोडण्याची कुठल्याच मुलाची हिंमत होत नाही. मात्र कौटुंबिक कलह नको, घरात कटकट टाळण्यासाठी वेगळे निघण्याचा जालिम उपाय शोधला जातो. त्यातही मुलगा सरकारी नोकर असेल तर आई-वडील स्वत: गावकडे राहणे पसंत करतात. कारण अनेक ठिकाणी सुनेला सासू-सासरे नकोच असतात. आम्हाला आमचे स्वतंत्र्य हवेय. दडपण नकोच या मानसिकतेमुळे सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा हट्ट धरला जातो. निघण्यासाठी मग ‘ट्यूशन’ सुरू होते आणि वादाची ठिणगी पडते. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या बारा महिन्यात महिला सहायता कक्षाकडे १ हजार ९४२ तक्रारी आल्या. त्यात ८० टक्के प्रकरणात समेट घडवलाच जातो. वाद प्राथमिक स्वरुपाचा असतानाच त्यावर उपचार झाल्यावर वाद मिटून त्यातून संसाराला चालना मिळते. मात्र, वाद हा जखमेप्रमाणे चिघळू लागल्यास त्याचे दुष्परिणाम दोन्ही कुटुंबांना भोगावे लागतात.कुठल्याही विवाहित स्त्रीला स्वतःचा संसार मोडावा, असे कधीच वाटत नाही. मात्र, लग्नानंतर नव्या कुटुंबीयांशी जुळवून घेण्यास तिला किमान दहा वर्षे लागतात. याच नाजूक वेळेत तिच्या गोंधळलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेत वेगळे काढण्यासाठी काहींचा खटाटोप सुरू असतो. नंतर हे प्रकरण विकोपाला जाते आणि स्वतंत्र संसार थाटण्याऐवजी प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन ठेपते. मग, चारित्र्यावर संशय, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि कुटुंबाची इभ्रत वेशीला टांगली जाते. सतत मोबाईलवर बोलणे, संसारात माहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप किंवा सासू-सासरे यांच्यावरून तसेच लग्नानंतरही दोघांपैकी एकाचे बाहेर प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कौटुंबिक वाद वाढत असल्याच्या तक्रारी पुढे येतात. यात नवरा-बायकोतील वादाचे प्रमाण पाहिले तर २०२४ या वर्षात एक हजार ९४२ तक्रारी महिला सहाय्यता कक्षाकडे आल्या. कौटुंबिक वादाचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. यातून महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. मात्र, अधुनिक युगात पती-पत्नी दोघे कमावते असूनही वाद होऊ लागले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये विवाहबाह्य संबंधाचा आरोप, दारुचे व्यसन यांसह वेगवेगळ्या कारणांनी पती-पत्नीत वाद वाढतच आहेत. याबाबतच्या तक्रारी महिला सहाय्यता कक्षाकडे आल्या आहेत.तरूण पिढीचे घटस्फोट न व्हावे, तसेच त्यांचा संसार वेलीवर आणण्यासाठी महिला सहायता कक्षाच्या पीएसआय कल्याणी पाटील, जीपीएसआय वैशाली महाजन, एलएससी आश्वीनी खुरपुडे, शोभा न्याहळदे, श्रद्धा सोनवणे, पो.ना.उपाली खरे, पीसी मंगलाताई तायडे आदींकडून समुपदेशन करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
घटस्फोटाचे महत्वाचे कारण
आम्हाला स्वतंत्र्य हवेय, दडपण नकोच या मानसिकतेमुळे कौटुंबिक कलहाच्या प्रमाणात वाढ, संसारात माहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप, दोघांपैकी एकाचे बाहेर प्रेमप्रकरण, अनेक ठिकाणी सुनेला सासू-सासरे नकोच असतात. ‘विवाहीत मुलीला तिच्या आईकडून फोनवर मिळालेली ट्यूशन. सतत मोबाईलवर बोलणे. विवाहीत मुलीचा गोंधळलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेत वेगळे काढण्यासाठी काहींचा खटाटोप. विवाहीत महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, ही कारणे आजच्या तरूण-पिढीसमोर घटस्फोटाच्या घटनेत वाढ होण्याची मुख्य कारणे आहेत.