गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकास एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
भुसावळ दि ८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकार सातत्याने घडवणाऱ्या संदिप बुधा खंडारे (वय २४, रा. दिनदयाल नगर, इंदिरा नगर, जामनेर रोड, भुसावळ) याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) नुसार कारवाई करत, उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांनी त्यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर ८ सप्टेंबर २०२५ रोजी निकालपत्र काढण्यात आले. आदेशानुसार, संदिप खंडारे यास तात्काळ रेल्वे किंवा रस्तामार्गाने जिल्ह्याच्या सीमेबाहेर जावे लागेल, अन्यथा पोलीस प्रशासन त्यास हद्दपार करून टाकेल.
सदर कालावधीत त्यास जिल्ह्याच्या सीमेच्या आत येण्यास बंदी असून, कोणत्याही कारणास्तव परत यायचे असल्यास उपविभागीय दंडाधिकारी, भुसावळ यांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. तसेच, हद्दपारीच्या कालावधीत तो जिथे वास्तव्यास असेल, त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला प्रत्येक महिन्याला एकदा आपला राहण्याचा पत्ता कळवणे बंधनकारक असेल.
जर त्याने महाराष्ट्र राज्याबाहेर प्रवास केला तर १० दिवसांत संबंधित पोलीस ठाण्याला कळवणे आणि परत आल्यानंतर १० दिवसांत नवीन पत्ता नोंदवणे आवश्यक आहे.
या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इतर व्यक्तींनाही चाप बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.