फुलगाव ग्रामपंचायतीत दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प; सदस्यांचा आरोप

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता भुसावळ : दि ९ :
तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीत मागील दोन वर्षांपासून कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत.यामागे ग्रामपंचायतीतील विरोधी गटाचा हेतुपुरस्सर अडथळा असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील आणि कविता चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ते म्हणाले, “ग्रामपंचायत ही गावच्या विकासासाठी असते.मात्र फुलगावमध्ये विकासाच्या नावाने शून्य काम झाले आहे. विशेषतः वार्ड क्र.२ मध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा रस्ते,गटारी,पिण्याचे पाणी,वीजपुरवठा या बाबतीत कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत.यामागे काही सदस्यांचा वैयक्तिक स्वार्थ आणि राजकारण आहे.
सचिन पाटील यांनी सांगितले,मी वारंवार पाठपुरावा करूनही निधी मंजूर केला जात नाही.काही सदस्य मुद्दाम अडथळा निर्माण करत आहेत.ही भूमिका म्हणजे लोकशाहीचा अपमान असून,जनतेच्या मताचा अनादर आहे.
कविता चौधरी यांनीही अशीच प्रतिक्रिया देत म्हटले, गावातील सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.पण राजकीय मतभेद आणि स्वार्थी राजकारणामुळे ग्रामपंचायतीच्या कामांना स्थगिती लागली आहे.हा प्रकार पूर्ण गावाच्या हिताला मारक आहे.
आंदोलनाचा इशारा –
सचिन पाटील यांनी पुढे इशारा दिला की,जर लवकरच विकासकामांना मंजुरी मिळाली नाही,तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.गावाचा विकास थांबवण्याचा प्रयत्न जोपर्यंत होईल,तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.जनतेचा आवाज दाबला जाणार नाही.ग्रामपंचायतीतील विकासकामे लवकरात लवकर सुरू करावीत, अशी मागणी या पत्रकार परिषेदेतून करण्यात आली.विरोधी गटाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

