सेवा तुमच्या दारी” भुसावळात महसूल विभागाचा भव्य सेवा पंधरवाडा!
[ सामान्यांच्या सोयीसाठी प्रशासन पुढे सरसावलं; शेतकरी, विद्यार्थी आणि गरजूंना दिलासा देणारे उपक्रम ]
भुसावळ, दि. ११ प्रतिनिधी : संतोष शेलोडे
राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सेवा पंधरवाडा यंदा भुसावळ शहरात भव्य स्वरूपात पार पडणार आहे. याबाबत माहिती देताना प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, “सामान्य माणसापर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी आणि विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”
सेवा शिबिरांतून दिला जाणार थेट लाभ –
थकबाकी वसुलीबाबत नागरिकांना जागरूकता आणि मार्गदर्शन,विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक दाखले तत्काळ उपलब्ध,
महसूल कार्यालयात येणाऱ्या अडचणी स्थानिक पातळीवरच सोडवणार,गावागावात शिबिरांचे आयोजन, लाभ थेट तुमच्या दारी
शेतकऱ्यांच्या वेदनांवर फुंकर – अर्थसहाय्याचा आधार –
आर्थिक अडचणीत असलेल्या आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटून, “आर्थिक आणि मानसिक आधार” देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.याअंतर्गत, अर्थसहाय्य योजनांचा लाभ तत्काळ पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे.
अवैध उत्खननावर प्रशासनाचा धसका –
भुसावळ व परिसरातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभाग विशेष मोहिम राबवणार आहे.प्रांताधिकारी पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, “अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.यामध्ये कोणतीही सहानुभूती बाळगली जाणार नाही.”
उपस्थिती लक्षणीय – जनतेच्या सेवेसाठी एकत्र आलेले हात –
या उपक्रमात स्थानिक पत्रकार, नागरिक, महसूल व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.हा उपक्रम केवळ सेवा देण्यासाठी नसून, न्याय, समता आणि शाश्वत विकासाची जाण निर्माण करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले .