वरणगाव आठवडे बाजारातील शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी
दुरुस्ती पूर्ण, तरीही सुविधा बंद; महिलांची होणारी गैरसोय वाढली

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी (ता. भुसावळ), दि. १५ सप्टेंबर:
शहरातील आठवडे बाजार परिसरात नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था अनेक दिवसांपासून नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत होती.अलीकडेच या शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली असली तरी अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाही.यामुळे विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तातडीने हे शौचालय सुरु करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आठवडे बाजार परिसरात दररोज तसेच आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.सार्वजनिक स्वच्छता सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना आणि विशेषतः महिलांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनही शौचालय बंद ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित शौचालयाच्या परिसरात नगरपरिषदेने एक सूचना फलक लावला असून, “शौचालय दुरुस्तीचे काम सुरू आहे. तोपर्यंत कृपया जवळील दुसऱ्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा,”असे नमूद करण्यात आले आहे.मात्र प्रत्यक्षात एक महिन्या पासून शौचालयाचे काम पूर्ण झाले असून,आता ते लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करावे,अशी ठाम मागणी स्थानिक व्यापारी,महिला आणि नागरिकांनी केली आहे.
वरणगाव नगरपरिषदेने नागरिकांच्या या मागणीची तातडीने दखल घ्यावी आणि आठवडे बाजारातील शौचालय तत्काळ सुरू करून जनतेच्या अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

