वरणगावच्या स्मशानभूमीत २५ वर्षे निस्वार्थ सेवा करणाऱ्या सुकलाल भोई यांना मानधन देण्याची नागरिकांची नगरपालिकेकडे मागणी

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता भुसावळ दि १३ :
वरणगाव शहरातील स्मशानभूमीत गेली २५ वर्षे अविरतपणे आणि निस्वार्थीपणे सेवा देणारे सुकलाल भोई हे आजही कोणत्याही मानधनाशिवाय काम करत असून स्मशानभूमीतील साफसफाई,प्रेतसंस्कारांची तयारी,अंत्यविधीमध्ये मदत अशा सर्व कामांमध्ये ते सातत्याने सक्रिय असतात.मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे नगरपालिकेच्या कोणत्याही प्रशासनिक अधिकाऱ्यांनी किंवा नगरसेवकांनी कधीही त्याच्या कार्याची दखल घेतलेली नाही.
सुकलाल हे गेली दोन दशके केवळ समाजसेवेच्या भावनेतून आपले काम करत आहेत.परंतु आता त्यांचे वय आणि परिस्थिती लक्षात घेता,त्यांना योग्य आर्थिक आधार मिळणे जरूरी असल्याची खंत व्यक्त होत आहे वरणगावातील अनेक नागरिकांनी या संदर्भात नगरपालिकेला स्पष्ट मागणी केली आहे.
सुकलाल दादांना तातडीने मानधन सुरू करावे.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नसताना, १५ दिवसांआड पाणी मिळत असताना देखील घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये वाढ केली जाते. त्यातून होणाऱ्या महसुलाचा उपयोग समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींवर का केला जात नाही ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
“जर आर्थिक अडचण असेल तर तुम्ही वरणगाव शहरवासीयांकडून वर्गणी गोळा करा,पण सुकलाल दादांसारख्या व्यक्तीची उपेक्षा करणे म्हणजे समाजसेवेचा अपमान आहे,”असेही एका नागरिकाने सांगितले.
स्मशानभूमीतील ‘अज्ञात हिरो’ सुकलाल दादांना न्याय मिळावा,आणि त्यांना किमान आर्थिक मदत मानधन त्वरित मिळावे,अशी मागणी शहरातील जनतेकडून होत आहे. नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा आहे.

