वरणगाव शिवारातील राख वाहिनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कडक कारवाई
दिपनगर औष्णिक केंद्राची ₹१० लाखांची बँक हमी जप्त; नदी व पाटचारीत राख टाकण्यास बंदी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव शिवारातील गट क्रमांक ७१० मधील अनियंत्रित राख वाहिनीमुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांचा गांभीर्याने घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप-प्रादेशिक कार्यालयाने कठोर पावले उचलली आहेत.याअंतर्गत,दिपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची ₹१० लाखांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे.याशिवाय नदी व पाटचारीत राख टाकण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
शेतकरी महेंद्र शेळके (वरणगाव) यांनी मंडळाकडे सादर केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.त्यांनी आपल्या तक्रारीत राख वाहिन्यामुळे शेतमालाचे नुकसान,जमिनीची घटलेली सुपीकता आणि पर्यावरणीय हानी याकडे लक्ष वेधले होते.या आधीही पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भुसावळ औष्णिक केंद्रावर ₹२५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आतापर्यंत एकूण ₹१ कोटी ३ लाखांची बँक हमी मंडळाने केंद्राकडून घेतली आहे.
उप-प्रादेशिक अधिकारी करणसिंह अ.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गट क्र. ७१० मधून राखेचे चोकप काढण्याचे काम करण्यात आले असून,पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारवायांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी महेंद्र शेळके यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वेळा तक्रारी करूनही योग्य ती कारवाई झाली नव्हती.शेतीचे प्रचंड नुकसान झाले.मात्र आता झालेल्या ठोस कारवाईमुळे समाधान वाटते.”स्थानिक नागरिक व शेतकरी वर्ग यांच्यात समाधान व्यक्त होत असून,भविष्यात अशा प्रकारच्या अनियमित व प्रदूषणकारी कृतींवर आणखी कठोर आणि तत्पर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, राख आणि औद्योगिक कचऱ्यामुळे संवेदनशील परिसंस्थांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे अशा कारवायांवर वेळेवर आणि प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे.