ओझरखेडा ते माळेगाव रस्त्यावर पाणीच पाणी; शेतकरी अडचणीत, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ओझरखेडा ते माळेगाव शिवारात जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.सध्या या मार्गावर सर्वत्र पाणीच पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मका, तूर, कपाशी,केळी यासारख्या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लाखो रुपयांचे पीक पाण्याखाली गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
यासोबतच या भागात जंगली प्राण्यांनीही शेतातील पिकांचे नुकसान सुरूच ठेवले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. “प्रशासन वेळेवर दखल घेत नाही,यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,” असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
ओझरखेडा-माळेगाव मार्गावर रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.रस्त्याच्या मोऱ्यांसाठी खोदलेला खड्डा अजून बुजवण्यात आलेला नाही.त्यामुळे रस्त्यावरून कोणतीही वाहतूक होऊ शकत नाही.शेतकरी वर्गाची मागणी आहे की, हा खड्डा तात्काळ बुजवून रस्ता सुरू करावा आणि परिसरात जेसीबी पाठवून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत.