जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यात महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जामनेर तहसीलदार कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकिसंग राजूपत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख अॅड. प्रकाश दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत, आज सोमवार २९ रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद असे की, तालुक्यातील शेतकऱ्यांना खर्च करून लागवड केलेली पिके कापूस, केळी, मका, सोयाबीन,फळबाग आणि कडधान्य या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरी हतबल होवून हवालदिल झालेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट तत्काळ मदत द्यावी. जामनेर तालुका परिसरात ओला दुष्काळ जाहीर करावा. केळी पिकाला हमीभाव जाहीर करून तो लागू करावा. तालुक्यातील बेघर झालेल्या कुटुंबीयांना अत्यावश्यक वस्तूचा तातडीने पुरवठा करावा आदी विविध मागण्यांसह तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी आदी मागण्या शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या आहेत.
निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख अॅड. प्रकाश दशरथ पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकरशेठ सराफ, शे. उस्मान अ. रज्जाक, मयूर पाटील, प्रकाश सूर्यवंशी, भाऊराव शंकर गोंधनखेडे, विक्रम घोंगडे, तुकाराम गोपाळ, अशोक लक्ष्मण जाधव यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी मान्यवरांसह ४० कार्यकर्ते, शेतकरी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.