फॅक्टरीमध्ये सार्वजनिक बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता भुसावळ, दि ३ऑक्टोबर :
आयुध निर्माणी वरणगाव येथील सार्वजनिक बुद्ध विहारात ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.या विशेष दिवशी सकाळपासूनच कार्यक्रमास भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भन्ते धम्म बोधी थेरो (संभाजीनगर) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर विहारात सामूहिक वंदना, त्रिसरण आणि पंचशील घेण्यात आले.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, महिला, युवक आणि वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.संपूर्ण बुद्ध विहार परिसर दीपांनी आणि फुलांनी सजवण्यात आला होता. कार्यक्रमात धम्म प्रवचन, गीतगायन आणि भिक्खू संघाचे मार्गदर्शनही झाले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारून भारतात नवचैतन्य निर्माण केलेल्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो.त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बुद्ध विहार समिती व स्थानिक अनुयायी मंडळींनी केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

