भुसावळच्या पाणीटंचाईवर उमेश नेमाडे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील तीव्र पाणीटंचाई, नियोजनशून्य पाणीपुरवठा आणि पाणीपुरवठा विभागाच्या कथित अनास्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश नेमाडे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करून जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भुसावळ शहराच्या इतिहासात प्रथमच जॅकवेल परिसरात पाण्याचा पूर्ण तुटवडा निर्माण झाला. मात्र, ही परिस्थिती उद्भवण्यापूर्वी कोणतेही प्रभावी नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असून, पैसे देऊनही खासगी टँकर उपलब्ध होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.याशिवाय, शहरात कोणत्या भागात, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला पाणीपुरवठा होणार, याबाबत अधिकृत वेळापत्रक जाहीर न केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांना रात्री-अपरात्री नळाला पाणी येण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.नेमाडे यांनी अशुद्ध पाणीपुरवठ्याचाही मुद्दा उपस्थित केला असून, पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, वर्षभरापूर्वी पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
निवेदनाद्वारे पाणीटंचाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई, नियमित व पारदर्शक पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करणे, शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी देणे तसेच भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता लेखी उत्तर आणि ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही उमेश नेमाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.